नाव्होली येथे विठ्ठल भेटीसाठी भक्तांची मांदियाळी! तरुणाईच्या मदतीने आणि गावकऱ्यांच्या वतीने आलेल्या भक्तांना दर्शनाबरोबर फराळाची उत्तम व्यवस्था
केज
केज तालुक्यातील नाव्होली येथे साक्षात पंढरीच्या पांडुरंगाने भेट दिलेल्या विठ्ठलाचा महिमा दिवसेंदिवस वाढत असून या विठुराया च्या दर्शनासाठी आषाढी वारी निमित्त अनेक ठिकाणा हून भक्तगण येत असल्याने गावकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील तरुणाईच्या मदतीने आणि गावकऱ्याने आलेल्या भक्तांना दर्शनाबरोबर फराळाची उत्तम व्यवस्था केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,केज तालुक्यातील नाव्होली येथे दि.१४ मे २०१४ रोजी नाव्होली येथील देशमुख कुटुंबांच्या मोरवंडी नावाच्या शेतात ते नांगरणी करत असताना नांगराच्या तासांमध्ये शाडू मिश्रित असणारी चार फूट उंचीची पांडुरंगाची मूर्ती नांगराच्या फाळाला अडकून वर आल्याने त्या परिवाराने त्या पांडुरंगाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना गावालगत असलेल्या शेरी वस्ती मध्ये केलेली आहे. तेव्हांपासून आजपर्यंत नाव्होलीच्या ग्रामस्थांनी या विठ्ठलाची मनोभावे पूजा अर्चा केलेली असून आजही त्याची महिमा मोठ्या प्रमाणा मध्ये दिसून येत आहे.माळरानावर सापडलेल्या या पांडुरंगाला भेटण्यासाठी केज तालुक्यासह धाराशिव व संपूर्ण बीड जिल्ह्यातून आषाढीवारी निमित्त या दिवशी भक्तगण नाव्होली गावांमध्ये येत आहेत.त्याच बरोबर या परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये दिंड्या घेऊन भक्तगण या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येताना आपल्याला पहावयास मिळतात.त्यामुळे आलेल्या भक्त गणांची गैरसोय होऊ नये.म्हणून आषाढी वारी निमित्त नाव्होली च्या सर्व ग्रामस्थांनी तरुणाईच्या मदतीने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने आलेल्या भाविक भक्तांना फराळाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये साबूदाणा खिचडी,नायलॉन साबूदाणा,केळी, भगर खिचडी अशा विविध प्रकारचे फराळ या ठिकाणी प्रसाद स्वरूपामध्ये भक्तगणांना वाटप करण्यात आला.ही फराळाची व्यवस्था सकाळी ८-०० पासून ते संध्याकाळी ११-०० वाजेपर्यंत सुरू होते. सकाळ पासूनच विठ्ठलाच्या मंदिराकडे भक्त जणांची रांग लागलेली होती.तर दैठणा, बहुला, नांदूरघाट, काळेगावघाट, अरणगाव, उत्तरेश्वर पिंपरी या ठिकाणावरून दिंड्याचे आगमन झालेले होते. त्यामुळे नाव्होली येथील या विठुरायाचा महिमा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. गेली ११ वर्षांपूर्वी माळरानावर सापडलेली ही विठ्ठलाची मूर्ती या आज पर्यंत एका पत्र्याच्या शेडमध्ये स्थापन करण्यात आलेली होती. मात्र गावचे सरपंच आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आता या ठिकाणी विठ्ठलाचे मोठे मंदिराचे बांधकाम सुरू असून मंदिरासमोर मोठा सभा मंडप तयार करण्यात आलेला आहे. काही दिवसांमध्ये त्याचे काम पूर्णत्वास जाणार असून लवकरच या नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरामध्ये या विठ्ठलाच्या मुर्तीची पुनर्स्थापना करण्यात येणार असून या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या या भव्य दिव्य मंदिरात येणाऱ्या भक्त गणांसाठी या ठिकाणी सर्व सोय करण्यात येणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा