*समाजाचा द्वेष झाला म्हणून आम्ही मात्र कुणाचाही द्वेष करणार नाही - धनंजय मुंडे*

*समाजाचा द्वेष झाला म्हणून आम्ही मात्र कुणाचाही द्वेष करणार नाही - धनंजय मुंडे*



*संघर्ष आपल्या रक्तात; तो शेवटपर्यंत करणार*

*अस्मिता आणि गुणवत्तेवर आक्षेप घेणाऱ्यांनो, आता बास! - मुंडेंचा इशारा*

*वंजारी समाजाच्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांचे जोरदार भाषण*

*ज्या दिवशी जात आड करून राजकारण करण्याची पाळी येईल, त्यादिवशी राजकारण सोडून देऊ - धनंजय मुंडे यांचे सर्वसमावेशक व सहिष्णू वागणुकीचे आवाहन*

*अनेक मान्यवरांचा विशेष गौरव*








*एकोप्याने राहून एकमेकांना सहाय्य करू - पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने*


ठाणे 

  मी राजकारणात आणि सामाजिक जीवनात सक्रिय झाल्यापासून आजपर्यंत माझ्यावर अनेक संकटे, अनेक संघर्ष आले, त्यांना मी सामोरे गेलो. मात्र यावेळी सलग २०० दिवस माझी मीडिया ट्रायल चालवली गेली. मी, माझे आई - वडील, माझी मुले - बाळे, माझी जात, माझा जिल्हा, माझी माती या सगळ्यांची बदनामी केली गेली. त्या सर्व बदनामीला मी संयमाने तोंड दिले. जात म्हणून अनेकांनी सातत्याने द्वेष भावनेने टीका टिप्पणी, आरोप केले. कुणी व्यक्ती दोषी असेल तर त्याला जरूर फाशी द्या, चुकीचे समर्थन कुणीच करणार नाही; समाज म्हणून तरीही आमचा जो द्वेष केला त्याला मात्र आम्ही द्वेषाने उत्तर देणार नाही. आम्हाला स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब, स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी सर्वसमावेशक कार्याची शिकवण दिलेली आहे. उलट आज जे जात म्हणून द्वेष करत आहेत, उद्या त्यांनीच आपल्याला सन्मानाची भावना व्यक्त करावी, असे काम एकत्रितपणे करून दाखवू, अस प्रतिपादन माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी ठाणे येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.

ठाणे शहरातील टीप टॉप प्लाझा येथे सकल वंजारी समाजाच्या वतीने वंजारी समाज अधिवेशन व विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते; या प्रसंगी श्री. मुंडे बोलत होते. यावेळी मागील २०० दिवस कोणत्याही गोष्टीवर व्यक्त न झालेल्या धनंजय मुंडे यांनी आज आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

मी स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचा संघर्ष अगदी जवळून पाहिला व अनुभवला आहे. मुळात संघर्ष हा आपल्या रक्तात आहे व तो आपण शेवटपर्यंत आवश्यकता असेल तिथे करत राहू, असेही धनंजय मुंडे म्हणाले. 

या काही महिन्यांच्या काळात अतिशय शांत राहून मी विरोधकांना उत्तर दिले नाही, सर्वजण म्हणायचे धनंजय प्रत्युत्तर का देत नाही, मात्र मी मनाशी ठरवले होते की प्रत्युत्तर द्यायचे नाही. पण काहींनी याचा गैरफायदा घेत आमच्या अस्मिता दुखावल्या. काहींनी तर गुणवत्तेवर आधारित नोकऱ्या मिळवलेल्या अधिकारी कर्मचारी यांची जात काढून त्यांना टोकाचा त्रास दिला, अगदी शासनाचे धोरण असलेल्या बिंदू नामावली वरून सुध्दा टार्गेट केले गेले, तेही सहन केले, मात्र आमच्या अस्मिता आणि गुणवत्तेवर आक्षेप घेणाऱ्यांना सांगतो, आता बास! यापुढे सहन करणार नाही; अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी अनभिक्षिप्त इशारा दिला आहे. 

या अधिवेशनाच्या माध्यमातून समाजातील गुणवत्तेच्या आधारावर आपल्या जीवनात उच्च पद प्राप्त करून प्रशासकीय सेवा, वैद्यकीय सेवा, पत्रकारिता, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली, त्यांचा गौरव करण्यात आला. 

यावेळी प्रशासकीय सेवेत प्रधान सचिव म्हणून उत्तम कामगिरी करणाऱ्या सुमंत भांगे यांच्याबाबत बोलताना धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जो शासन निर्णय राज्य सरकारने घेतला, तो स्वतः सुमंत भांगे यांनी ड्राफ्ट केलेला होता, याचाही आवर्जून उल्लेख श्री. मुंडे यांनी केला. 

ज्याला जातीयवाद करायचा त्यांना खुशाल करू द्या, आपण मात्र कधीही कुणाची जात पाहून काम करणार नाहीत. स्व. मुंडे साहेब व स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी सर्वसमावेशक कामाची शिकवण दिली, त्यातून वाटचाल करत असताना आजवर जात पाहून मी कधी राजकारण केले नाही, ज्या दिवशी जात पाहून राजकारण करण्याची वेळ येईल, त्यादिवशी राजकारण सोडून देईन, असेही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले. 

या वाईट काळात सातत्याने समाजाने माझ्या पाठीशी खंबीर ताकत उभी केली, माझ्या कातडीचे जोडे करूनही मी ते ऋण फेडू शकणार नाही. आपली परंपरा व अस्मिता जोपासण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना मोठ्या शहरांमध्ये वसतिगृहे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी आपल्याला सूचना केलेली असून, त्यासाठी कुणाकडेही मागणी करणार नाही, आपला हक्क आपण मिळवू, असे ठाम मत यावेळी मुंडेंनी व्यक्त केले. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनीही मार्गदर्शन केले. वंजारी समाज आज प्रगतीच्या वाटेवर असताना सर्वांना सोबत घेऊन चालावे. एकोप्याने राहून एकमेकांना शिक्षण आणि सदाचाराचा संदेश देऊ, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. 

यावेळी व्यासपीठावर माजी प्रधान सचिव सुमंत भांगे, यांच्यासह प्रशासकीय सेवा, वैद्यकीय सेवा, शिक्षण, उद्योग, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य, संस्कृती इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांचा तसेच यूपीएससी व एमपीएससी सह विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या नवनिर्वाचित अधिकाऱ्यांचा विशेष गौरव सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन आयोजक तथा भारतीय रेल्वे बोर्डाचे सदस्य धनराज गुट्टे यांनी केले, तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. अमोल गित्ते यांनी भूमिका बजावली.

व्यासपीठावर माजी आ. संजय दौंड, लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, ज्येष्ठ नेत्या सुशीला ताई मोराले, धुळे महापालिकेचे माजी महापौर प्रदीप करपे, मीराबाई संस्थानच्या महंत ह. भ. प. राधा ताई सानप, आदिनाथ महाराज, पानेगावकर महाराज, यांच्या सह विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय सेवेतील अधिकारी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा