एच.पी.एम.चा बेजबाबदार कारभार; केज बसस्थानका जवळील पूल वापरण्याआधीच कोसळला!"

एच.पी.एम.चा बेजबाबदार कारभार; केज बसस्थानका जवळील पूल वापरण्याआधीच कोसळला!"

गुण नियंत्रक पथक नुसते नावालाच ?



केज 

केज येथील बसस्थानकाबाहेरील वाहतुकीसाठी नव्याने उभारण्यात आलेला पूल अवघ्या काही तासांतच खचल्याने आणि त्यातील लोखंडी सळया बाहेर पडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, हा पूल अजून वाहतुकीस अधिकृतपणे खुला देखील झाला नव्हता, तरीदेखील एकच वाहन गेल्यानंतर या पुलावर खड्डा पडल्याची घटना समोर आली आहे.

केज बसस्थानकात वाहने ये-जा करण्यासाठी बाहेर निघणाऱ्या मार्गावरून नाल्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या नाल्यावर पूल बांधण्याचे काम एच. पी. एम. कंपनीकडे सोपवण्यात आले होते. मात्र, कंपनीने अत्यंत हलगर्जीपणे व निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते.

जनतेकडून असा प्रश्न निर्माण होतो की, सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः प्रवाशांच्या दैनंदिन वापरातील रस्ते व पूल बांधताना प्रशासन आणि ठेकेदार कंपन्या इतक्या बेफिकीर कशा राहू शकतात? केवळ दाखवण्यापुरते काम करून करोडोंच्या निधीचा अपव्यय आणि नागरिकांच्या जिवाशी खेळ, हे थांबवण्यासाठी प्रशासन काय पावले उचलणार?

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलावर एक वाहन गेल्यानंतर तिथे मोठा खड्डा पडला आणि त्यातून बाहेर आलेल्या तुटलेल्या लोखंडी सळया स्पष्टपणे दिसून येत आहेत. हे दृश्य केवळ लाजिरवाणे नसून धोकादायक देखील आहे. जर हा पूल अधिक वेळ उपयोगात राहिला असता, तर एखाद्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता आली नसती.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. प्रवाशांना बसस्थानकात येण्यास आणि तिथून बाहेर पडण्यास आता अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना यामुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक नागरिक आणि प्रवासी यांच्याकडून एच. पी. एम. कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यासोबतच, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा