केज तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना,शेत रस्ते मोकळे करण्या साठी १० ते १३ जून दरम्यान विशेष मोहीम
केज तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना,शेत रस्ते मोकळे करण्यासाठी १० ते १३ जून दरम्यान विशेष मोहीम.
केज
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शेतीपूरक रस्ते अत्यंत आवश्यक आहेत. शेतकरी आपल्या शेतावर वेळेवर पोहोचू शकतील,उत्पादनाची वाहतूक सुकर होईल यासाठी शेत रस्त्यांचे अस्तित्व आणि मोकळे पण महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ नुसार तसेच मामलेदार कोर्ट अधिनियम १९०६ चे कलम ५ नुसार तहसीलदारांना शेतरस्ते उभारणी व अडथळा दूर करण्याचे अधिकार आहेत.सद्यस्थितीत केज तालुक्यातील ३४० अर्जांपैकी केवळ ४८ शेतरस्ते खुले करणे शक्य झाले असून उर्वरित प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. लवकरच खरीप हंगाम सुरु होणार असल्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनी पर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर केज तहसील कार्यालयात दि.१० जून २०२५ ते दि.१३ जून २०२५ या कालावधीत विशेष शेत रस्ता अर्ज स्वीकृती मोहीम राबविण्यात येणार आहे.ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेत रस्ता उपलब्ध नाही किंवा अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर अडथळा निर्माण झालेला आहे,अशा शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालय,केज येथे प्रत्यक्ष येऊन अर्ज करावा.या चार दिवसांच्या विशेष मोहिमेत प्राप्त अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून शेत रस्ते खुले करण्याचे नियोजन तहसील प्रशासनाने केले आहे.यासाठी ग्रामविकास विभाग, भूमी अभिलेख कार्यालय,पोलीस प्रशासन तसेच महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयाने काम केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राकेश गिड्डे तहसीलदार केज यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा